ठाणे – ठाण्यातील रंगायतन सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकून मारले. शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झाले आहे. त्यामध्ये काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून शिवसैनिकही जखमी झाल्याची माहिती आहे.
राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवून शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करत त्यांच्या ताफ्यातील गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्याने ठाण्यात वातावरण तापलं आहे. तर स्थानिक शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरले आहे.
पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले –
मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.