- दहशतवाद्यांशी संबंध आहे का, याचा तपास करणार
पुणे – महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी छापे टाकत देशातील मोठे ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. हिमाचलातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई केली गेली. यामध्ये दोघांना ताब्यात घेतले असून, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे लोहमार्ग पोलिसांनी डिसेंबरअखेरीस ड्रग्ज पेडलरवर कारवाई करुन 120 कोटी रुपयांचे 34 किलो चरस हस्तगत केले होते. त्याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ड्रग्ज माफियांचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का? हेही तपासले जात आहे.
लोहमार्ग पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत जप्त केले होते, असे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांनी सांगितले होते. हे चरस मनालीहून पुण्यात आणण्यात आले होते. येथून गोवा, मुंबई, बंगळुरू आणि पुणे शहरांत विकले जाणार होते. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट आणि हॉटेल व्यावसायिक ललितकुमार दयानंद शर्मा (49, रा. व्हिलेज शमशी), कौलसिंग रुपसिंग सिंग (40,रा.कुलू, हिमाचल) अशी आरोपींची नावे आहेत. हे चरस पुण्यात येणार असल्याची माहिती आयपीएस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुपमधून मिळाली होती.
त्यानुसार तब्बल महिनाभर पाळत ठेऊन ही कारवाई केली गेली. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी काही पथके मनालीला तपासासाठी रवाना करण्यात आली होती. याची व्याप्ती मोठी असल्याने केंद्रीय व राज्य पातळीवरील तपास यंत्रणांना याची माहिती देण्यात आली होती.
या ड्रग्ज तस्करीची व्याप्ती सहा राज्यांमध्ये पसरलेली आहे. यामुळे याची माहिती व तपासास सहकार्य करण्याची विनंती केंद्रीय अंमलीपदार्थ विरोध पथक व महाराष्ट्र एटीएसला करण्यात आली होती. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांची सहा पथके हिमाचल प्रदेशात रवाना झाली होती. महाराष्ट्र एटीएसच्या कारवाईत लोहमार्ग पोलिसांची पथकेही सहभागी आहेत.
– सदानंद वायसे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे