यवत – सहजपूर (ता. दौंड) गावाच्या हद्दीतील होलेवस्ती येथे महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन, दोन-तीन वर्षांपासून लावलेला झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या शाखेचा बोर्ड काढून टाकल्याने तिघांविरोधात यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ऍट्रॉसिटीचा) गुन्हा शुक्रवारी (दि. 12) दाखल करण्यात आला.
अलंकार बाळासाहेब कांचन (रा. उरुळी कांचन, ता. हवेली), भीमा भिवा चोरमले आणि लक्ष्मण भिवा चोरमले (दोघे रा. सहजपूर, ता. दौंड) असे ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपाली तुकाराम लोंढे (वय 36) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणाची अधिक माहिती अशी आहे की, सहजपूर गावच्या हद्दीत झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या शाखेचा बोर्ड पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला लावलेला आहे.
दीपाली लोंढे आणि त्यांची जाऊ यांनी आपल्या गायी महामार्गाच्या कडेला झाडाला बांधलेल्या ठिकाणी चारा टाकण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी अलंकार कांचन तेथे आला व या महिलांना म्हणाला की, ही जागा तुमची आहे का, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लावलेला शाखेचा बोर्ड पाडून घेऊन गेला आहे. अलंकार कांचन याच्या सांगण्यावरून भिवा चोरमले व लक्ष्मण चोरमले या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली दिल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.