शिवीगाळ, मारहाणप्रकरणी 6 जणांवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

शिरूर तालुक्‍यातील निमोणे येथील घटना

निमोणे(प्रतिनिधी) – निमोणे (ता. शिरूर) परिसरातील काळेवस्ती येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबास किरकोळ कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करत तलवार, लोखंडी चैन तसेच लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केल्याने सहा जणांविरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी नाना काळे, अक्षय काळे, पप्पू काळे तसेच इतर तीन जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंद्रकांत प्रकाश धुळे यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली.

सोमवारी (दि. 20) दुपारी चारच्या सुमारास चंद्रकांत धुळे आपल्या घरासमोर जेवण करीत असताना दादा काळे हे यांच्या शेळ्या घराशेजारी चारत होते. यावेळी शेळ्या चरत चरत धुळे यांच्या बाजरीच्या कणसांत आल्या. त्यावेळी धुळे यांनी काळे यांना त्या शेळ्या बाजरीच्या कणसातून बाहेर काढा असे सांगितले.

त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास नाना काळे, अक्षय काळे, पप्पू काळे तसेच अनोळखी तीनजण दोन गाड्या घेऊन धुळे यांच्या घरी आले. आणि चंद्रकांत त्यांचे वडील व चुलत भाऊ यांना जातिवाचक शिवीगाळ करीत लोखंडी गज, तलवार, गाडीची चैन आणि लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत.

आरोपींची गय केली जाणार नाही…

निमोणे येथील भिल्ल समाजातील व्यक्‍तींना मारहाण करुन फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. यातील काही आरोपींवर यापूर्वी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आरोपींना कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करणार असल्याचे दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी यावेळी सांगितले.

या प्रकारामुळे धुळे कुटुंबीय दहशतीच्या वातावरणाखाली आले आहे. बुधवारी (दि. 22) दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस तसेच शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन धुळे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच पोलिसांकडुन तुम्हाला सहकार्य आणि संरक्षण दिले जाईल, असे आश्‍वासन दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.