तळेगाव दाभाडे – व्याजाच्या बदल्यात 26 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून महिलेला ब्लॅकमेल केले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मार्च ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत सोमाटणे, दिल्ली-पठाणकोट, अमृतसर, सूरत (गुजरात) येथे घडली.
किरण रंभाजी घारे (वय 40, रा. बेबडओहोळ, ता. मावळ), दीपक प्रकाशचंद्र ओसवाल (वय 46, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित 26 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण घारे याच्याकडून फिर्यादी महिलेने एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात त्याला 50 हजार रुपयांचे दोन चेक दिले होते. परंतु, आरोपीने व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. त्याला फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने फिर्यादीचा नवरा व मुलगा यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपीने फिर्यादीला मोटारीमध्ये बसवून पिस्तुलाचा धाक दाखवून दिल्ली, पठाणकोट, अमृतसर व सूरत, गुजरात येथे घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केले. मोबाइलमध्ये त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून फिर्यादीला ब्लॅकमेल केले. त्यानंतर महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. माझ्या विरुद्ध तू कुठेही तक्रार द्यायला गेली तरी कोणीही माझे काही वाकडे करू शकत नाही, असे आरोपी हा फिर्यादीला म्हणाला. तुमच्या घरी बायका पाठवतो, तेव्हा तुम्ही पैसे द्याल, अशी धमकीही आरोपीने दिली.
आरोपी घारे हा गुंड प्रवृत्तीचा असून, तो फिर्यादीच्या परिस्थितीचा फायदा घेईल हे माहीत असतानाही त्याची चांगली व्यक्ती म्हणून आरोपी ओसवाल याने फिर्यादीशी ओळख करून दिली. यातून आरोपी ओसवाल याने फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक शहाजी पवार तपास करीत आहेत.