अर्मेनियातील अत्याचार म्हणजे वांशिक हिंसाचारच : बायडेन

विल्मिंग्टन  – आर्मेनियातील नागरिकांचे 20 व्या शतकात ओट्टोमा साम्राज्याच्या सैन्याकडून केले गेलेले अपहरण आणि हत्या म्हणजे वांशिक हिंसाचारच असल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांई केले आहे. मित्र देश तुर्कीबरोबरचे संबंध बिघडायला नको, म्हणून अमेरिकेने आतापर्यंत या आत्याचारांना “वांशिक हिंसाचार’ म्हणून संबोधलेले नव्हते, असे बायडेन म्हणाले.

आर्मेनिया वांशिक हिंसाचाराचा स्मृती दिन मानला जाईल, असे आश्‍वासन बायडेन यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. त्या आश्‍वासनाची पूर्तता बायडेन यांनी केली. आर्मेनियातील हिंसाचाराच्या घटनांना 1915 सालापासून सुरुवात झाली होती. स्थानिक अर्मेनियानांना हुसकावून लावण्यासाठी हे हत्याकांड आणि वांशिक हिंसाचार घडवला गेला होता. मध्यपूर्वेतील सामर्थ्य संपन्न तुर्की आणि नाटो दरम्यानचे संबंध बिघडू नयेत म्हणून अमेरिकेच्या यापूर्वीच्या अध्यक्षांनी या हिंसाचारांना वांशिक हिंसाचार म्हणणे टाळले होते.मात्र आर्मेनियाच्या नागरिकांवरील अत्याचारांची दखल घेतल्याने भविष्यातील सामूहिक अत्याचारांच्या घटना टाळल्या जाऊ शकतील, असे बायडेन म्हणाले.

आर्मेनियाच्या सुमारे 20 लाख नागरिकांना माघारी पाठवले गेले होते. तर 15 लाख जणांची हत्या करण्यात आली होती. या सामूहिक हत्याकांड आणि अपहरणाला “मेझ येघेम’ असे संबोधले जाते. तब्बल 106 वर्षांपूर्वी या छळवादाला बळी पडलेल्या आर्मेनियाच्या लाखो नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांच्या वतीने बायडेअ यांनी आदरांजली वाहिली.

भविष्यात अशाप्रकारचा वांशिक हिंसाचार घडू नये, यासाठी या हिंसाचाराला “वांशिक हिंसाचार’ म्हणून मान्य करणे आणि या अत्याचारात बळी पडलेल्या आर्मेइयाच्या 16 लाख नागरिकांना आदरांजली वाहने गरजेचे होते, असे अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशीन्यान यांनी बिडेन यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले.

तुर्कीने बायडेन यांच्या निवेदनाचा केला धिक्कार
बायडेन यांनी 1915 सालच्या घटनांबाबत केलेले निवेदन आर्मेनियातील कट्टरवादी गटांच्या दबावाखाली आणि तुर्कीच्या विरोधात आहे, असे सांगून तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवहूत कावूसोग्लू यांनी बायडेन यांच्या निवेदनाचा धिक्‍कार केला. केवळ शब्द बदलल्याने इतिहास बदलला जाऊ शकत नाही. इतिहासाचे पुनर्लेखनही केले जाऊ शकत नाही, असे ते ट्विटरवर म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.