न्यायालयाने आरोपीला सुनावली पोलीस कोठडी
जामखेड – येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून नाशिक येथे नेण्यात आले. तेथे तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. तसेच आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना काही सांगू नको. नाही तर तुला जीवे मारील, अशी धमकी दिल्याची फिर्याद पीडित मुलीने जामखेड पोलिसांत दिली. याप्रकरणी ऍट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली याप्रकरणी आरोपी सागर अभिमान खाडे (वय 19) व त्याचे वडील अभिमान खाडे (पूर्ण नाव माहीत नाही, दोघे रा. घोडेगाव, ता. जामखेड) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घोडेगाव येथील अल्पवयीन मुलगी ही जामखेड येथे इयत्ता 12 मध्ये महाविद्यालयात शिकत आहे. आरोपी देखील त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यामुळे दोघांची ओळख होती.
25 मे रोजी आरोपीने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून कारने नाशिक येथे पळवून नेले. तसेच त्या ठिकाणी आपण लग्न करू असे सांगत शारीरिक अत्याचार केले. याबाबत 25 रोजी जामखेड पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्या नुसार प्रथम अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र 28 मे रोजी मुलीस व आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मुलीने न्यायालयात दिलेल्या जबाबानुसार वरील आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच मुलाच्या वडिलांनी मुलीस जर तू या प्रकरणी पोलिसांना काही सांगितले, तर तुला जीवे मारील, अशी धमकी दिली होती. त्यामुळे आरोपीच्या विडिलाविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप हे करत आहेत.