‘एटीएम’ची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे

खर्चबचतीसाठी बॅंकांचे दुर्लक्ष

हडपसर – बॅंकांच्या खातेदारांना हवे तेव्हा पैसे देणारी एटीएम यंत्रणा आता सुरक्षा रक्षकांविना असुरक्षित बनत चालली आहे. हडपसर व मांजरी-महादेवनगर मधील अंदाजे 68 एटीएमपैकी बहुसंख्य राष्ट्रीयकृत आणि खासगी बॅंकांच्या एटीएमची दारे सताड उघडी तर अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून आले.

एटीएमवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत त्याद्वारे मिळणारे उत्पन्न नगण्य असल्याने खर्चकपातीसाठी बॅंकांनी हा निर्णय घेतल्याची एका बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा रक्षकांना द्यावा लागणारा पगार, एटीएमसाठी आवश्‍यक वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यामुळे बॅंकांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत एटीएममधून बॅंकांना मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. खर्चातून बचतीसाठी सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात येत आहे.

हडपसर गाव, ससाणेनगर रस्ता, पुणे-सोलापूर महामार्ग, पंधरानंबर फाटा, महादेनगर रस्ता व मांजरी बुद्रुक या भागातील अनेक एटीएम रात्री शटरडाऊन असतात. अनेक एटीएम केंद्रात पैसे नसतात, तेथे सुरक्षा रक्षक नसल्याने दरवाजे उघडे असतात. अनेक एटीएममध्ये मोकाट कुत्री झोपलेली तर स्लीपांचा कचरा कोपऱ्यात पडलेला असल्याने बरीच एटीएम केंद्रे कचराकुंडी झाली आहेत.

गुन्हे घडण्याची वाट पहाताय का?
एटीएम बाहेर आऊटसोर्सिंगद्वारे खासगी कंत्राटदारांद्वारे दोन किंवा तीन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र, हे चित्र आता बदलत आहे. आता हळूहळू सर्वच एटीएम केंद्रे सुरक्षारक्षकांनविनाच असून बॅंकांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. बॅंका आता पुन्हा मोठे गुन्हे घडण्याची वाट पाहात आहेत काय? असा सवाल ग्राहकांतून केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.