छत्रपती संभाजीनगर – महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या 2100 रुपये मासिक आश्वासनाकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे. विरोधकांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य करत सरकारला सल्ला दिला आहे. “2100 रुपये देणे कठीण असले तरी पुढील बजेटच्या आधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत,” अशी मागणी त्यांनी केली.
आठवलेंचा दौरा आणि वक्तव्य
रामदास आठवले छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना, औरंगजेबाची कबर आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवर भाष्य केले. “सरकारच्या आश्वासनामुळेच महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. आता त्यांचे पैसे पुढील बजेटपूर्वी द्यावेत,” असे ते म्हणाले.
औरंगजेबाच्या कबरीवर मत –
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार उसळला होता, यावर आठवले म्हणाले, “औरंगजेबाला चांगला प्रशासक म्हणणे चुकीचे आहे. हा विषय विनाकारण उकरू नये. कबर हटवण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, पण कबर हटवू नये.” त्यांनी दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी करत हिंदू-मुस्लिमांना शांततेचे आवाहन केले. “मुस्लिमांनी आपले नाते औरंगजेबाशी जोडू नये, आपली औलाद त्याची नाही,” असेही ते म्हणाले.
खासगी क्षेत्रात आरक्षणाची मागणी –
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवर बोलताना आठवले म्हणाले, “दलितांकडे कमी लक्ष दिले जाते. सरकारने खासगी क्षेत्रात आरक्षणाचा निर्णय घ्यावा. भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेप्रमाणे योजना सुरू करून दरमहा 5-10 हजार रुपये द्यावेत.” तसेच, महाबोधी विहाराच्या वादावर ते म्हणाले, “गयातील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्यावे. मी स्वतः तिथे जाणार आहे. सध्याचे ट्रस्टी रद्द करा आणि ट्रस्टमध्ये इतरांचा समावेश करू नये.”
आठवलेंच्या या वक्तव्यांनी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला असून, सरकार काय पावले उचलते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.