मिलान – इटालियन लीग फुटबॉल स्पर्धेत अटलांटाने एसी मिलानशी 1-1 बरोबरी केली आहे. यामुळे त्यांचे स्पर्धेच्या विजेतेपदाची आशा कायम राहिली आहे.
या सामन्यात एसी मिलानच्या हाकान चालहनोगू याने 14 व्या मिनिटालाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यावेळी अटलांटाच्या खेळाडूंनी गोल करण्याचे केलेल्या सर्व प्रयत्नांना अपयश येत होते. मिलानचा बचाव अभेद्य बनत चालला होता. त्याचवेळी दुवान झापाटा याने अप्रतिम गोल करत संघाला या सामन्यात बरोबरी मिळवून दिली. पहिला हाफ 1-1 अशा बरोबरीवर संपला.
दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आपले आक्रमण वाढवले. मात्र, त्यांना गोल करण्यात यश आले नाही. अटलांटाला 7 कॉर्नर मिळाले होते; परंतु त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यश आले नाही.
अटलांटाला या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी या सामन्यात बरोबरी किंवा विजय मिळवणे आवश्यक बनले होते. गुणतालिकेत आता अटलांटाचे 75 गुण झाले असून युवेन्ट्सने 80 गुणांसह आघाडी कायम राखली आहे. मात्र, त्यांना साखळीतील गणितांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
गुणतालिकेत युवेन्ट्स संघ आघाडीवर असला तरीही त्यांना आता अन्य लढतींच्या निकालावर तसेच अखेरच्या साखळी सामन्यातील विजयावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना सॅम्पदोरियाविरुद्धचा सामना जिंकावा लागेल.
इंटर मिलानचा जिनोआकडून पराभव झाला पाहिजे. आता शनिवारच्या लढतीत अटलांटाने एसी मिलानशी बरोबरी केल्याने युवेन्ट्सला सॅम्पदोरियाविरुद्धच्या सामन्यात विजय अनिवार्य बनला आहे.