साताऱ्यात सफाई कर्मचारी नुसतेच हजेरीला

सातारा  – सातारा पालिकेच्या स्वच्छ सुंदर साताऱ्याच्या वल्गना आरोग्य विभागाने पोकळ ठरवल्या आहेत. हजेरी पत्रकावर सही करून सातत्याने दोन वर्ष गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रभाग 20 ची सार्वजनिक स्वच्छता धोक्‍यात आली आहे, असा आरोप नगरसेविका लीना गोरे यांनी केला. यासंदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

सातारा पालिकेचे आरोग्य विभाग व्यवस्थापन व सफाईला जाणारे कर्मचारी नियंत्रणाअभावी सोकावले असून नगरसेवकांनाच गंडवण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत. प्रभाग 20 मध्ये नगरसेविका लीना गोरे यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा प्रचंड मनःस्ताप होत आहे. मंगळवार पेठेचा फडके हॉस्पिटल ते काशी विश्‍वेश्‍वर ते सोनीच्या गिरणीपर्यंतचा वर्दळीचा भाग गोरे यांच्या वॉर्डात येतो. मात्र, पाच सफाई कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचारी कामावर येण्याऐवजी सह्या नोंदवून बेपत्ता होत असल्याने वॉर्डाची स्वच्छता धोक्‍यात आली आहे.

वॉर्डला मुकादम नसल्याने तक्रार कोणाकडे करायची, ही अडचण आहे. एका कर्मचाऱ्याला मुकादमाचा चार्ज देण्यात आला आहे. मात्र, हा कर्मचारी नावालाच मुकादम असून पळून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे फावले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांचा नियमित पगार निघतो, अशी धक्कादायक माहिती आहे. नगरसेविका लीना गोरे यांचे पती राजू गोरे यांनी आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारावर प्रकाश टाकला आहे. हा वॉर्ड आरोग्य निरीक्षक यादव यांच्याकडे आहे. ते या वॉर्डात वर्षातून दोन वेळाच फिरकल्याची माहिती दिली. आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी यांच्यातील हजेरीचे साटेलोटे अर्थपूर्ण असल्याची चर्चा आहे.

काशी विश्‍वेश्‍वर चौकातील वॉटर फाउंटन लीना गोरे यांच्या प्रयत्नातून विकसित करण्यात आले. मात्र, सफाई कर्मचारी नसल्याने स्वतः राजू गोरे यांना हौदात उतरून सफाई करण्याची वेळ आली. त्यामुळे वॉर्डात केवळ हजेरी लावणारे कर्मचारी प्रत्यक्षात जातात कुठे, की आरोग्य निरीक्षक त्यांच्या फुकट हजेरीचा मलिदा लाटतात, याचा बारकाईने शोध आणि त्याचा सोक्षमोक्षही जबाबदारी आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी पार पाडायची आहे. ठोस कारवाई करण्यासाठी त्यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या अनागोंदी कारभाराच्या विरोधात लीना गोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.