पाबळ – पाबळ येथील पद्ममणी जैन इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात उत्साही संयोजक व पालकांनी शिवाजीराजेंच्या वेशभूषेतील बालकलाकाराला चक्क घोड्यावर व प्रेक्षकामधून मंचावर आणले. त्यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकाराला दाद दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षद गांधी, विशेष अतिथी शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब उदामले, पालक शिक्षक संघटनेचे गावडे व गांधी, जैन ट्रस्टचे संचालक सतीश गांधी, केतन शहा, केंद्रप्रमुख सुपेकर, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात सतीश गांधी यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी शालेय अभ्यासक्रम, विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान पदके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्नेहसंमेलनात प्रारंभी सरस्वती देवी स्तुतीपर व बहिणाबाई यांच्या कवितेवर आधारित नृत्य सादर करण्यात आले. यावेळी तब्बल तीन तास चाललेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलाविष्काराने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका चासकर व महिला शिक्षिका, कर्मचाऱ्यांनी केले.