नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा भारतीय राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार हे गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रीय पातळीवर केंद्रातील प्रमुख पक्ष काँग्रेससह प्रादेशिक पक्षांनी हातमिळवणी करावी यासाठी त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत संपूर्ण देश अक्षरशः पिंजून काढला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना काँग्रेसच्या आडकाठी भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात यश मिळत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस-आम आदमी पक्ष यांच्या आघाडीबाबत चर्चा सुरु आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस तथा आपचे सामान्य कार्यकर्ते अशी आघाडी करण्याच्या बाजूने कौल देताना दिसत असले तरी काँग्रेसचे जेष्ठ नेते मात्र अशा आघाडीला विरोध दर्शवत आहेत. आम आदमी पक्षाकडून देखील याआधीच काँग्रेसकडे मैत्रीचा हात पुढे करण्यात आला होता मात्र ‘आप’ला काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाहीये.
लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या असून आता काँग्रेस-आम आदमी पक्ष यांच्या आघाडीबाबत काय तो निर्णय व्हावा यासाठी काँग्रेस हायकमांडकडून मध्यस्ती करण्याची भिस्त जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे वृत्त आहे. शरद पवार हे दिल्लीमध्ये अशाप्रकारची आघाडी व्हावी यासाठी प्रयत्नशील असून ते आम आदमी पक्ष व दिल्ली काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांची मनधरणी करत असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.