कार आणि टॅंकरची समोरासमोर धडक : फलफले कुटूंबीयांवर काळाचा घाला
मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलीसह तीन महिला
सोलापूर : पुणे-पंढरपूर महामार्गावर वेळापूरजवळ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टॅंकर व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात देवदर्शनासाठी जात असताना घडला.
या अपघातात ठार व जखमी झालेले सर्वजण वैराग (ता. बार्शी) येथील रहिवाशी आहेत. वैराग येथील फलफले कुटूंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात शिवराज नागेश फलफले (वय 38), दिनानाथ उर्फ बाबासो नागेश फलफले (वय 34), वनिता शिवराज फलफले (वय 30 वर्षे), उत्कर्ष शिवराज फलफले (वय 9 वर्षे), सहयाद्री बाबासो फलफले (वय 6), पार्वती महादेव फलफले (वय 80 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पुजा दिनानाथ उर्फ बाबासो फलफले (वय 28), उत्कर्षा शिवराज फलफले (वय 11) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेळापूरजवळ पुणे-पंढरपूर महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणा-या टॅंकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यु झाला. कार पुण्याहून वैरागकडे येत असताना हा अपघात झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींवर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.