लाहोर : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) ९९ प्रवासी आणि आठ कर्मचारी असलेले विमान शुक्रवारी कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील दाट लोकवस्ती असलेल्या निवासी परिसरात कोसळून ९७ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातातून दोन जण सुदैवाने बचावले आहेत.
पाकिस्तानील बँक ऑफ पंजाबचे प्रमुख झफर मसूद आणि झुबेर नावाचा एक व्यक्ती या भीषण अपघातातून बचावला आहे. सुदैवाने बँक ऑफ पंजाबचे सीईओ झफर मसूद यांना फक्त फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
लाहोरहून उड्डाण केलेले पीके-८३०३ हे विमान कराचीला उतरण्यासाठी अवघ्या एका मिनिटाचा कालावधी राहिलेला असतानाच मलीर येथील मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन परिसरात कोसळले. यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होऊन तेथील अनेक जण जखमी झाले आहेत. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले आहे. अनेकांनी सोशल मिडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होताना स्पष्टपणे दिसत आहे.
Exclusive CCTV Footage of today Plane Crash Near Karachi Airport#Breaking #PlaneCrash #Karachi #Pakistan #PIA pic.twitter.com/WXlOzLrGPm
— Weather Of Karachi- WOK (@KarachiWok) May 22, 2020
दुर्घटनाग्रस्त विमान रडारवरून अदृश्य होण्यापूर्वी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क साधून विमान उतरविण्यासाठी असलेल्या गिअरमध्ये समस्या असल्याची माहिती दिली होती. विमानाच्या अवशेषांखाली अडकलेल्यांना काढण्याचे काम अद्याप सुरू असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. इम्रान खान यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.