त्रिपोलीवर हवाई हल्ला : 28 ठार

त्रिपोली (लिबिया) : लिबियाची राजधानी त्रिपोलीवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 28 जण ठार झाले. तर अन्य 37 जण जखमी झाले. यातील बहुसंख्य विद्यार्थी असल्याचा दावा लिबियाच्या आरोग्य प्रशासनाने केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य खात्याचे प्रवक्ते मालेक मेरसेट म्हणाले, त्रिपोलीच्या दक्षिणेकडील हबदा भागात हे हवाई हल्ले करण्यात आले. या भागात गेले महिनाभर युध्द सुरू आहे. जनरल खलीफा हिफ्टर यांच्या नेतृत्वाखालील स्वयंघोषित लिबियन राष्ट्रीय आर्मी आणि कमकुवत असणारी मात्र संयुक्त राष्ट्रेचा पाठींबा असणारे सरकार यांच्यात एप्रिलपासून संघर्ष सुरू आहे. संयुक्त राष्ट्रेच्या पाठींब्यावर त्रिपोलिवर सरकार ताबा टिकवून आहे.

गेल्या आठवड्यात हिफ्टर यांनी अतिम आणि निर्णायक लढा देण्याची घोषणा केली. त्यानंतर सरकारने तुर्कस्तानशी करार केला. तुर्की सैन्य या भागात तैनात करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रक्तबंबाळ जखमींचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. लिबियन नॅशनल आर्मीने हा हवाई हल्ला केल्याचा आरोप सरकारने केला आहे. मात्र त्यावर या आर्मीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.