जळगाव : जळगाव जिल्ह्यातील फैजपूरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एक डंपर आणि क्रूझर जीपची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना रस्त्यावर घडली आहे. तर या भीषण अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या लोकांचा या अपघातात बळी गेला आहे ते एका लग्न समारंभाहून घरी परतत असताना रविवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुन आणि निंबोल गावातील महाजन, पाटील आणि चौधरी कुटुंबीय विवाह समारंभासाठी चोपडा येथे क्रूझर गाडीने निघाले होते. चोपडा येथील विवाह समारंभाहून रात्रीच्या वेळेस परत येत असताना यावल तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ दिपनगरहबन राखेने भरलेल्या डंपरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल गावच्या बाळू नारायण चौधरी यांच्या मुलीच्या विवाहनंतर तिच्या सासरी चोपडा येथे कार्यक्रमांकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात नवरीचे वडील बाळू चौधरी त्यांच्या पत्नी मंगला चौधरी यांचाही मृत्यू झाला आहे.