नवी दिल्ली – युद्धनौका आयएनस विराटची तोडफोड करत भंगारात काढण्याला अखेर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आयएनस विराटला भंगारात काढण्यावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या याचिकेला खूप उशीर झाला असल्याचे सांगत याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला. मुंबईमधील एका कंपनीने गोवा सरकारच्या मदतीने इतिहासाची साक्षीदार असणाऱ्या आयएनएस विराटला म्युझिअममध्ये रुपांतरित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण गेल्या एक वर्षांपासून सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत त्यांच्या हाती निराशा आली आहे.
जगात सर्वात जास्त सेवा करणारी आयएनएस विराट युद्धनौका सप्टेंबर 2020 मध्ये मुंबईहून गुजरातमधील अलंग येथे पोहोचली होती. जहाज तोडणी कार्यशाळेत तिचे भाग वेगळे करून ते भंगारात विकण्याचे ठरले होते.
भारतीय नौदलात 1987 मध्ये सामील करण्यात आलेली ही युद्धनौका श्रीराम ग्रुपकडून 38.54 कोटी रुपयांना घेण्यात आली. आयएनएस विराट ही जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली युद्धनौका असून ती सेंटॉर वर्गातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती. 29 वर्षे ती नौदलाच्या सेवेत होती व मार्च 2017 मध्ये ती सेवेतून बाद करण्यात आली.
या युद्धनौकेवर सागरी संग्रहालय करण्याचा प्रस्ताव होता, पण जुलै 2019 मध्ये नौदलाच्या सल्ल्यानेच ही युद्धनौका मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले होते. 2014 मध्ये मोडीत काढण्यात आलेल्या आयएनएस विक्रांतनंतरची ही दुसरी युद्धनौका आहे.
दरम्यान, 1982मध्ये अर्जेटिना विरुद्धचे फॉकलंड युद्ध रॉयल ब्रिटिश नौदलाने जिंकले. त्यावेळी ही विमानवाहू युद्धनौका वापरण्यात आली होती. तिचे वजन 27800 टन असून ब्रिटनच्या नौदलात तिने सेवा केली. 1959 ते 1984 या काळात एचएमएस हर्मीस नावाने ती ओळखली जात होती. नंतर या युद्धनौकेची डागडुजी करुन ती भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आली. 80च्या दशकात भारतीय नौदलाने 65 दशलक्ष डॉलर्सला ही युद्धनौका घेतली होती. ती 12 मे 1987 रोजी भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती.