पूर्वी पक्षाच्या रंगात रंगविले होते फलक
पिंपरी – महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विविध विषय समित्यांच्या फलकांसाठी आपल्या पक्षाच्या रंगाचा वापर केला होता. विशेष म्हणजे समिती फलकांवर महापालिकेचे बोधचिन्ह लावणे बंधनकारक असताना त्याकडे पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते.
याबाबत दैनिक “प्रभात’मध्ये 16 फेब्रुवारी 2021 रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे सचिव रुपेश पटेकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले होते. तर याबाबत आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता.
अखेर याबाबत सत्ताधारी पक्षाला जाग आली आहे. विविध विषय समित्यांच्या कार्यालयातील नामफलकांचा रंग बदलण्यात आला आहे. महापालिकेमध्ये शहर सुधारणा, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती, विधी, महिला व बालकल्याण समिती आहे.
या समितीच्या सभापतींनी महापालिकेमध्ये सदस्यांच्या नावाचे फलक पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे केले होते. मात्र आता ते बदलण्यात आले आहेत. पूर्वी ज्या रंगात फलक लावले जात त्या रंगाचा वापर करून नवीन फलक बनविण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या बोधचिन्हांचाही वापर करण्यात आला आहे.