पाटण (प्रतिनिधी) – कुसरूंड ता. पाटण येथील ऊसाच्या शेतात भांगलण करीत असलेल्या स्थानिक महिलांना आज रविवारी दि.20 रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान अजगर दिसला. अजगर पाहताच आजूबाजूचे लोक पाहण्यासाठी त्याठिकाणी जमा झाले. परंतु, अजगर काही जागचे हालले नाही. गावातील ग्रामस्थ आणि सर्पमित्र अक्षय हिरवे, विकास माने यांच्या मदतीने अंदाजे साडे आठ ते दहा फूट लांबीचा आणि 20 ते 30 किलो वजनाच्या सुस्त अजगराला पकडले. या अजगराला पोत्यामध्ये जेरबंद करून पाटण येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सर्प मित्रांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुसरूंड येथील मोरणा नदीच्या जवळ असलेल्या खडकओढाच्या जवळील शिवारामध्ये ऊसाची शेती आहे. गावातील प्रगतीशील शेतकरी मधुकर शिंदे यांच्या ऊसाच्या शेतात भांगलणीचे काम सुरू होते. महिला भांगलण करीत असताना त्यांना ऊसाच्या सरीमध्ये सुस्त अवस्थेत पडलेले अजगर दिसले. त्यांनी मधुकर शिंदे यांना सांगितले. त्यांनी याची माहिती पाटण येथील वन विभागास कळवली. तसेच गावातील तरुण युवकांनी सर्प मित्रांना फोन केला.
तातडीने मोरगिरी येथील अक्षय हिरवे आणि कोयना विभागातील विकास माने यांनी सर्पमित्रांना येथे येऊन अजगरला पकडले. त्यांना गावातील तरूण युवक नितीन शिंदे, भरत पवार, नितीन सुतार, तानाजी शिंदे, सुरेश जाधव, तानाजी शिंदे, रामचंद्र सुतार यांनी सहकार्य केले. अजगराला पोत्यामध्ये जेरबंद करून ते पाटण येथील वनविभागाच्या ताब्यात देणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. गेल्या वर्षी पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असलेल्या आब्रंग गावात भात कापणीच्या वेळी असाच अजगर शेतकऱ्यांना पाहण्यास मिळाला होता.