पुणे, दि. 2 (वृत्तसंकलन : सागर येवले, गणेश आंग्रे) -चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्याची तयारी पूर्ण होताच, रात्री ठीक 1 वाजता पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 200 मीटरचा परिघ निर्मनुष्य करण्यात आला. पोलिसांनी काउंटडाउन सुरू केले आणि प्रत्यक्षदर्शींसह माध्यमांवर लाइव्ह पाहणाऱ्यांनी श्वास रोखले….कान टवकारले…आणि स्फोट होताच “पूल पडला’ म्हणत सुटकेचा निश्वास सोडला. ब्लास्टमुळे धुळीचे लोट पसरले. 10 मिनिटांनी धूळ बाजूला झाली, मात्र पूल “जैसे थे’ दिसून आला. त्यामुळे “प्लॅन फसला’ अशी चर्चा पसरली. मात्र, इडिफाइस कंपनीच्या इंजिनियरने “आम्हांला अपेक्षित होता असा पूल पडला,’ असे सांगत कामाला सुरुवात केली.
ब्लास्ट झाल्यानंतर इडिफाइसच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली. त्यानंतर 20 मिनिटांनी प्रत्यक्ष ब्रेकर आणि पोकलॅनच्या मदतीने खिळखिळा झालेला पूल पाडण्यास सुरुवात झाली. ब्रेकरच्या सहायाने पुलाची वरील बाजू आणि खांब तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. 1 वाजून 40 मिनिटांनी पुलाची एक संपूर्ण बाजू पडली, तर दुसरी बाजू 2 वाजून 30 मिनिटांनी पडली. त्यानंतर सिमेंट, लोखंडी सळया असलेला राडारोडा उचलण्याची लगबग सुरू झाली. पहाटे 6 वाजेपर्यंत जवळपास निम्मे काम पूर्ण झाले होते. तर, सकाळी 10 वाजता सर्व राडारोडा उलचलून महामार्ग आणि शहरातील वाहतूक सुरू करण्यात आली.
थांबायचे नाही… गड्या थांबायचे नाही
ब्लास्ट झाला आणि ब्रेकर, जेसीबी, पोकलेन ही सामग्री उर्वरित पूल पाडण्याच्या तयारीला लागले. मध्यरात्री सव्वा वाजता सुरू झालेली कामाची “धडधड’ सकाळी साडेदहा वाजता थांबली. यावेळी ब्रेकर, जेसीबी, टिप्पर यावरील चालक सलग 11 तास काम करत होते. त्याआधीही त्यांची लगबग सुरू होती. तर अन्य कर्मचारीही यामध्ये सहभागी होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक उपस्थितांनी केले.
असा होता उड्डाणपूल पाडकामाचा घटनाक्रम…
वेळ – घटना
11.00:महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली
11.50:स्फोटकांची पाहणी करून दोन्ही बाजूंनी जिओ टेक्स्टाइल पडदा टाकण्यात आला
12.20:ब्लास्ट 1 वाजता करण्याचा निर्णय घेण्यात आला.
01.00:प्रत्यक्ष ब्लास्ट झाला
01.15:अधिकाऱ्यांकडून पुलाची पाहणी सुरू
01.25:प्रत्यक्ष ब्रेकर, जेसीबीच्या सहायाने पूल पाडण्यास सुरुवात
01.40:पुलाची उजवी बाजू पडली (एनडीएच्या बाजूची)
2.30:पुलाची डावी बाजू पडली (बावधन बाजूची)
06.00:पूल पाडण्याचे 50 टक्के काम पूर्ण
10.08:राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण. रस्ता वाहतुकीसाठी खुला