वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. सुनीता यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील ओहायो येथे झाला. त्यांचा प्रवास मेरीलँडमधील ॲनापोलिस येथील यूएस नेव्हल अकादमीमध्ये सुरू झालाअसून तेथे त्यांनी 1983 मध्ये प्रवेश घेतला होता.
विल्यम्स यांनी 1987 मध्ये कठोर लढाऊ हेलिकॉप्टर प्रशिक्षण घेतले आहे आणि पर्शियन आखाती युद्धादरम्यान इराकमधील कुर्दीश भागांवर नो-फ्लाय झोन स्थापित करणे आणि मियामीमध्ये चक्रीवादळ अँड्र्यू मदत कार्य अशा खडतर मोहीमांमध्ये त्यांचा सहभाग होता. स्वतःला हनुमान भक्त म्हणवणाऱ्या सुनीता आज एक प्रख्यात अंतराळवीर म्हणून ओळखल्या जातात.
सुनीता विल्यम्स 1993 मध्ये नौदल चाचणी पायलट झाल्या. त्यांना 30 प्रकारच्या विमानांचे उड्डाण करण्याचा अनुभव आहे आणि 2,770 पेक्षा जास्त तास त्यांनी उड्डाण केले आहे. फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्या 1998 मध्ये नासाच्या अंतराळवीर कार्यक्रमात सामील झाल्या.
आता 5 जून रोजी सुनीता त्यांच्या अनुभवी सहकाऱ्याला घेऊन बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानाने अंतराळात गेल्या आहेत. तथापि, तांत्रिक अडचणी आल्या असल्यामुळे त्यांचा तेथील मुक्काम लांबला आहे फेब्रुवारी 2025 मध्ये स्पेसएक्सद्वारे त्या पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.