रमेश कदम प्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक बडतर्फ

चार कॉन्स्टेबलदेखील निलंबित

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि अपक्ष उमेदवार रमेश कदम यांना तुरूंगाबाहेर काढल्या प्रकरणी ठाणे पोलिस आयुक्तांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी 4 पोलिस कॉन्स्टेबलांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर सहाय्यक पोलिस निरिक्षकाला बडतर्फ केले आहे. रमेश कदम यांना मदत केल्याचा या 5 पोलिसांवर ठपका होता.

सहाय्यक पोलिस निरिक्षक रोहिदास पवार यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर पोलिस कॉन्स्टेबल डी चव्हाण, डी खेताडे, यू. कांबळे, व्ही. गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी रमेश कदम ठाण्यातल्या घोडबंदर रोड येथे असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये आढळून आले होते. त्याठिकाणी आणखी एक व्यक्ती होती. पोलिसांनी या फ्लॅटमधून 53 लाखांची रक्कम जप्त केली होती.

ठाणे गुन्हे शाखा आणि निवडणूक विभागाने ही कारवाई केली होती. रमेश कदम सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना जे.जे रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तपासणी झाल्यानंतर त्यांना ठाण्यातील तुरुंगात नेण्याऐवजी पोलिस एस्कॉर्ट पथकाच्या अधिकाऱ्यांने एका खासगी गाडीने त्यांना घोडबंदर येथील एका फ्लॅटवर नेले. याचवेळी त्या फ्लॅटवर ठाणे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी रमेश कदम यांच्यासह एक व्यक्ती आणि लाखांची रोख रक्कम जप्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.