अमरावतीत सहाय्यक उपनिरीक्षकाची आत्महत्या 

पोलीस आयुक्त, उपायुक्त जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून गळफास
 
अमरावती – आजारी रजा काळासोबत कर्तव्यावरील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या अमरावतीच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस तत्कालिन पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि लिपिक जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत आपल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

रामसिंग गुलाबसिंग चव्हाण (56) असे मृत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गत 32 वर्षांपासून पोलीस सेवेत असलेले एएसआय रामसिंग चव्हाण यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले आहेत. पत्नी अनिता या अमरावती महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. एक मुलगा पुणे आणि दुसरा मुलगा अमरावतीत शिक्षण घेत आहे.

गतवर्षी ड्युटीवर असताना रामसिंग यांचा अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्‍टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे रामसिंग ड्युटीवर हजर राहू शकले नाही. या काळात त्यांचे वेतन काढण्यात आले नाही. प्रकृती बरी झाल्यानंतर रामसिंग कर्तव्यावर रुजू झाले. परंतु त्यानंतरही त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही.

त्यामुळे कर्जबाजारी होऊन पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाला पैसे पाठविणे रामसिंग यांच्यासाठी अशक्‍य झाले होते. म्हणून ते मानसिक तणावात होते. रविवारी 10 मार्च रोजी रात्रीची ड्युटी केल्यानंतर साप्ताहिक सुटी असल्याने रामसिंग सोमवारी घरीच होते. पत्नी ड्यूटीवर आणि मुलगा अमन महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांनी बंद घरात गळफास लावून आत्महत्या केली.

रामसिंग यांनी मृत्यूपूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती. तत्कालिन पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि लिपिक आपल्या आत्महत्येस जबाबदार असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यसंस्कार करू नये, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. पत्नीची माफी मागून मुलांची काळजी घेण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी चिठ्ठीतून केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)