पुणे (प्रतिनिधी) : शहरात कठोर निर्बंध घालण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पुणे पोलिसांचा ‘भरोसा कक्ष’ तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून शहरातील १३६ ज्येष्ठ नागरिकांना मदत पोहोचविण्यात आली. रुग्णालयात जायचे आहे, गॅस संपला, जेवणाचा डबा तसेच औषधे हवी आहेत, किराणा माल, भाजी हवी आहे, अशा प्रकारची मदत ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे मागितली होती.
ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांचा भरोसा कक्ष तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. टाळेबंदीच्या काळात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस शहरातील वेगवेगळ्या भागात काम करणाºया १९० ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात आहेत. शहरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यात येत असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरातील तीन ते साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांना अन्न, पाणी तसेच औषधांचे वाटप करण्यात येत आहे.
अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहायक आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, सहायक फौजदार अडसुळ, शिंदे, कांबळे, चाबुकस्वार, गायकवाड आदी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळवण्यासाठी :- ज्येष्ठ नागरिक कक्ष , हेल्पलाईन क्रमांक १०९० आणि ०२०-२६११११०३