मावळ तहसीलदार कार्यालयाकडून स्पष्टीकरण
वडगाव मावळ -“कोविड-19′ च्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात वास्तव्यास सर्व नागरिक, स्थलांतरित मजूर आणि पदाधिकारी यांना सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून मदत केली जाईल, तशी व्यवस्थाही करण्यासाठी तहसील कार्यालय प्रयत्नशील राहिल. मजुरांकडून वारंवार खाण्याच्या वस्तू, किराणा, पुरवठा विभागातील धान्य यांची मागणी तहसीलदार कार्यालय मावळच्या कंट्रोल रुमला केली जात आहे. मात्र तहसील कार्यालयाच्या मदतीने तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांकडून मदत पुरविली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मावळ तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे केवळ आणि फक्त एप्रिल महिन्याचे विविध योजना अंतर्गत धान्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध करण्यात आलेले आहे. याच शिधापत्रिकाधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत त्यांचे योजनेचे धान्य उचलल्यानंतर प्रतिव्यक्ती पाच किलो प्रमाणे तांदूळ मोफत दिले जाणार आहेत.
मावळ तालुक्यात राहणाऱ्या परंतु महाराष्ट्रातील कुठल्याही गावातील शिधापत्रिकाधारकाला मावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या योजनेचे देय व त्यानंतर प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिले जाणार आहे.
ज्या व्यक्ती-कुटुंब खऱ्याच गरजू आहेत, त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या कंट्रोल रुमला (दूरध्वनी क्रमांक 02114 235440) फोन करावा. त्यांची अन्नधान्याची गरज भागविण्याचा आम्ही या दानशूर व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून आवश्य प्रयत्न करू, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचे आवाहन
करोनाचे संकटांमध्ये आपआपल्या घरी राहून व “सोशल डिस्टंसिंग’ पाळून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मावळ तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.