नगर (प्रतिनिधी) –करोनाच्या पार्श्वभूमिवर मनपाने सुरु केलेल्या विलगीकरण कक्षासाठी “आमी’ संघटना व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब अहमदनगर मिडटाऊन संस्थांच्या वतीने 100 बेडचे साहित्याची मदत बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात सुपूर्द केले.
रोटरी’ चे अध्यक्ष डॉ. प्रदीप चोभे व आमी चे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, उपायुक्त सुनील पवार यावेळी उपस्थित होते. राज्यातून व जिल्ह्यातून नगरमध्ये हजारो नागरिक येण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या वतीने विलगीकरण कक्ष आणि एम्स हॉस्पिटल येथे कक्ष उभारण्यात येत आहे. या दोन्ही सेंटर्स साठी भरपूर साहित्यांची गरज आहे. ही गरज ओळखून आमी आणि रोटरी मिडटाऊन या दोन्ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन 100 बेडचे साहित्य पुरवले असल्याचे कटारीया म्हणाले.
उपायुक्त पवार यांनी महापालिका प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. चोभे म्हणाले, रोटरी क्लब मिडटाऊन या संस्थेने समाज कार्याचा विडा उचलला असून जिथे गरज आहे तेथे आम्ही स्वतःहून पोहचत असतो. लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी गरजू बंधू भगिनींना अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे. आता याच सामाजिक दायित्वात्वतून मनपाला आमी संघटनेला बरोबर घेत साहित्य पुरवले.
आमी चे अध्यक्ष राजेंद्र कटारिया म्हणाले, “आमी संस्थेच्या वतीने कोरोना संदर्भात अनेक मदतीचे उपक्रम राबविले आहेत. लॉकडाऊन मुळे आज एमआयडीसी मधील कारखाने बंद असल्याने उद्योजक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीतही सामाजिक भावनेतून मदत कार्य करत आहोत.”
यावेळी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, दौलत शिंदे, दिलीप अकोलकर, अशोक सोनवणे, ऍड.अभय राजे, अमोल घोलप, जयद्रथ खाकळ, सुमित लोढा आदी उपस्थित होते. यावेळी आमी संघटना व रोटरी क्लबचे समन्वयक क्षितिज झावरे यांनी प्रास्ताविक केले. तर रोटरी चे सचिव ऍड. हेमंत कराळे यांनी आभार मानले.