400 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त

पुण्यातील एका डेअरीवर आयकर विभागाची मोठी कारवाई

नवी दिल्ली – आयकर विभागाने पुण्यातील एका डेअरीवर आणि दुग्ध पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकली. ही कंपनी मुळची पुण्याची आहे. या धाडीनंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाने आणखी काही ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईतून आयकर विभागाच्या हाती तब्बल 400 कोटींची बेहिशोबी मालमत्ता लागली आहे.

याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आयकर विभागाने 24 नोव्हेंबरला एका डेअरीवर आणि दुग्ध पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर धाड टाकली होती. या धाडीच्या आधारावर मिळालेल्या माहितीच्या आधारावर जवळपास सहा शहरांमध्ये विविध 30 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यातून तब्बल 400 कोटींची बेहिशोबी मालमत्ता मिळाली आहे, असे सीबीडीटीने सांगितले आहे.

आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत बेहोशी रोकड आणि 2.50 कोटींचे दागिने जप्त करण्यात आले होते. याशिवाय काही बॅंक लॉकरचा तपास केला जात आहे. विशेष म्हणजे या कारवाईत अनेक दोषी कागदपत्रे आणि करचुकवेगिरीचे पुरावे सापडल्याची माहिती सीबीडीटीकडून देण्यात आली आहे.

या कागदपत्रांचा तपास केला असता बोगस खरेदीचा दावा करणे, बेहिशेबी खरेदी-विक्री, रोख कर्ज व्यवहार आणि त्याची परतफेड याबाबत अस्पष्टता आढळली आहे. तसेच अशा विविध मार्गांचा वापर करुन करपात्र उत्पन्नाची चोरी झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. विशेष म्हणजे त्या कागदपत्रांमध्ये पशुधनाची विक्री किंवा मृत्यू झाल्यामुळे झालेल्या नुकसानीचा चुकीचा दावा केल्याची उदाहरणेही लक्षात आली आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.