नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालय ( ईडी ) अर्थात ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत जप्त केलेल्या संपत्तीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार ईडीने या कायद्याअंतर्गत तब्बल 1 लाख 45 हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यातील 21 हजार 370 कोटी ही संपत्ती फक्त 2024 आणि 2025 मधील नऊ महिन्यांत जप्त केलेली आहे.
1 जुलै 2005 साली पीएमएलए हा कायदा लागू करण्यात आला होता. टॅक्स चोरी, काळा पैसा, मनी लॉन्ड्रिंगसारखे गुन्हे करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी हा कायदा आणण्यात आला. हा कायदा आणून 20 वर्षे झाली आहे. त्या वीस वर्षात ईडीने 1 लाख 45 हजार कोटींची संपत्ती जप्त केली. 2005 नंतर ईडीने आतापर्यंत 911 जणांना अटक केली आहे.
44 प्रकरणात पीएमएलएअंतर्गत 100 लोकांना दोषी ठरवले आहे. ज्यात 36 लोकांना एप्रिल ते डिसेंबरपर्यंत दोषी ठरवले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मागील पाच सहा वर्षांत ईडीने मनी लॉन्ड्रिंगविरोधात आपल्या कारवाईचा वेग वाढवला आहे. अनेक नेते, व्यापारी, सायबर गुन्हेगार, तस्करांना अटक केली आहे.
ईडीच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून 1 लाख 19 हजार कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत. परंतु, गेल्या काही वर्षात ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे. ईडीचा वापर फक्त विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे, असा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षाकडून केला जात आहे.