अमरदीप वाकडे ; प्रदर्शनास पहिल्याच दिवशी गर्दी
कराड – विजय दिवस समारोह समितीच्या माध्यमातून कराडात अनेक वर्षापासून दिमाखात सुरु झालेला हा सोहळा सैन्यदलाच्या शस्त्रास्त्र सज्जतेची चुणूकच देत असून कराडकरांसाठी ही एक आनंद पर्वणीच आहे. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र खडा पहारा देणाऱ्या या जवानांचा संपूर्ण देशवासियांना गर्व आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले.
लिबर्टी मैदानावर विजय दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शन व विविध दालनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, शिवसेनेचे नितीन काशिद, पालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेविका विद्या पावसकर, सुदर्शन पाटसकर, ऍड. परवेझ सुतार, चंद्रकांत जाधव तसेच समारोह समितीचे सर्व पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
या शस्त्रास्त्र प्रदर्शनामध्ये सैन्यदलातील जवळून लांब मारा करणारी शस्त्रे, जमिनीवरुन आकाशात मारा करणारी शस्त्रे, विविध प्रकारच्या बंदुका, रडार यंत्रणा, शिवकालीन आयुधे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची महती सांगणारे दालन तसेच व अन्य शस्त्रे यांचा समावेश करण्यात आला आहे. शनिवार व रविवार अशी दोन दिवस सलग सुट्टी असल्याने शाळा, महाविद्यालय तसेच कराड तालुक्यातील असंख्य नागरिकांनी पहिल्याच दिवशी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी लिबर्टी मैदानावर गर्दी केली होती. या प्रदर्शनात विजय दिवस समितीची शहिदों की गॅलरी लावण्यात आली आहे.