assembly elections: ‘मुंबईतील जागांवर ठाकरे गटाचेच वर्चस्व’, जागावापटपाबाबत संजय राऊतांच मोठं विधान

assembly elections : येत्या दोन-तीन महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांची काल, शनिवारी जागावापटपाबाबत बैठक झाली.
या बैठकीत प्रामुख्याने मुंबईतील जागांबाबत चर्चा झाली असून मुंबईतील जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वरचष्मा राहील, असे संकेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले.
महाविकास आघाडीच्या काल, शनिवारी झालेल्या बैठकीत मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा झाली आणि 99 टक्के जागांवर घटक पक्षांमध्ये सहमती झाल्याचे त्यांनी स्पष्ट करतानाच, पुढील सरकार महाविकास आघाडीचेच असेल असा दावा त्यांनी केला.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून सर्वच दृष्टीने महत्त्वाची आहे. मुंबईतील जागावाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. मुंबईत कायम शिवसेनेचे, मराठी माणसाचे वर्चस्व राहिलेले आहे.
ही मुंबई लुटण्याचे, तोडण्याचे कारस्थान दिल्लीतून सुरू असून त्याला शह देण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणे सर्वांसाठी आवश्यक आहे, असे सांगत मुंबईतील सर्वाधिक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहतील, असे संकेत त्यांनी दिले.



