नवी दिल्ली –खलिस्तानवाद्याशी संबंध असल्याचा आरोपांना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी “शोले’ या हिंदी चित्रपटामधील एका डायलॉगच्या माध्यमातून हल्लाबोल केला. “मी असा दहशतवादी आहे जो भ्रष्टाचार करणाऱ्यांना घाबरवतो. यामुळे मुलगा 100-100 मैल भ्रष्टाचार करतो, तेव्हा आई म्हणते झोप बाळा झोप नाहीतर केजरीवाल येईल, अशी स्वतःची बाजू मांडीत केजरीवाल यांनी खलिस्तानीचा आरोप करणाऱ्याना सडेतोड उत्तर दिले.
पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खालिस्तानी समर्थक असल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर केजरीवाल विरोधकांवर हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहे. केजरीवाल लखनौ दौऱ्यावर असून, त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी हिंदी चित्रपट शोलेचा प्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून विरोधकांनावर टीकेची झोड उठवली.
दहशतवादी दोन प्रकाराचे असतात. एक जो जनतेला घाबरवतो आणि दुसरा जो भ्रष्टाचाऱ्यांना घाबरवतो. असे दोन प्रकारचे दहशतवादी असतात. पुढे केजरीवाल म्हणाले मी, असा दहशतवादी आहे जो भ्रष्टाचार करणाऱ्यांना घाबरवतो.
यापूर्वी दहशतवादीच्या आरोपावर केजरीवाल म्हणाले होते की, ज्या व्यक्तीला आपण दहशतवादी म्हणत आहात, त्याने दिल्लीतील सरकारी शाळेत 12,340 स्मार्ट वर्ग तयार केले आहेत. केजरीवाल पुढे म्हणाले की, देशातील सर्व भ्रष्टाचारी माझ्या विरोधात एकत्र आले आहेत.