कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये चोवीस परगणा जिल्ह्यात तृणमूल कॉंग्रेसच्या एका स्थानिक नेत्याची हत्या करण्यात आल्याने त्या भागात तणाव निर्माण झाला आहे. अमिर अलिखान असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. ते सकाळी बसंती भागात मॉर्निंग वॉक घेत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गावठी बॉम्ब फेकून त्यांची हत्या करण्यात आली. त्यात अन्य तीन जणही जखमी झाले.
तथापि, तृणमूल कॉंग्रेसमधील गटबाजीतूनच ही हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक कयास आहे. येथे तृणमूल कॉंग्रेसची युवक शाखा आणि मुख्य पक्ष यांच्यात वाद आहेत. या हत्या प्रकारानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्याच पक्षाच्या युवक शाखेच्या नेत्याच्या घराची मोडतोड केली.
तथापि, तृणमूल कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनी मात्र हा पक्षांतर्गत गटबाजीतून झालेला प्रकार नाही असे स्पष्ट केले आहे. उलट विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या हत्येचा हा प्रकार आहे, असा आरोप केला आहे.