इस्लामाबाद – पाकिस्तानमधील कैबर पख्तुन्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान येथील महापौरपदाच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या एका उमेदवाराची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
हत्या झालेले उमर खेताब शेरानी हे पाकिस्तानमधील आवामी नॅशनल पार्टीचे उमेदवार होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे.
शनिवारी संध्याकाळी शेरानी यांच्या घराबाहेरच काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर लगेचच हल्लेखोर पळून गेले. शेरानी यांच्या हत्येचे वृत्त पसरताच त्यांच्या घराजवळ कार्यकर्त्यांची गर्दी झाली. शेरानी यांच्या हत्येचा निषेध यावेळी करण्यात आला. कार्यकर्त्यांनी शेरानी यांचा मृतदेह घेऊन साऊथ सर्क्युलर रोड येथे आंदोलन केले आणि वाहतुक रोखून धरली.
दरम्यान जमात ए इस्लामीचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताक अहमद खान यांनी या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. सरकारी सुरक्षा कर्मचारी सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवण्यात व्यस्त होते आणि नागरिकांना दहशतवाद्यांच्या हवाली सोडून देण्यात आले, अशी टीका यावेळी करण्यात आली. इम्रान खान यांच्या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना दोन वर्,े उशीर केला आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.