कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये उत्तर 24 परगणा जिल्ह्यात तिटागड येथे एका स्थानिक भाजप नेत्याची हत्या करण्यात आली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी मनीष शुक्ला नावाच्या स्थानिक भाजप नेत्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. ते स्थानिक नगरसेवकही होते.
तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे; पण तृणमूलने तो आरोप फेटाळला आहे. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, कारण स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास राहिलेला नाही, असा दावा भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केला.
भाजपचे खासदार अर्जुनसिंग यांनीही या प्रकरणात तृणमूल कॉंग्रेसवरच आरोप केला आहे. आपल्यावरही गोळ्या झाडण्याचा प्रकार झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, भाजपमधील अंतर्गत गटबाजीतूनच ही हत्या झाल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसचे नेते निर्मल घोष यांनी केला आहे. या हत्येच्या निषेधार्थ भाजपने बराकपोरा भागात आज बारा तासांचा बंद पुकारला होता.