पाकिस्तानात न्यायाधीशाची हत्या; 5 संशयितांना अटक

पेशावर  – पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्याप्रकरणी पाच संशयितांना आज अटक करण्यात आली. दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश आफताब आफ्रिदी आणि त्यांच्या कुटुंबातील तिघा सदस्यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी हत्या केली होती. हत्या झालेल्यांमध्ये न्यायाधीश आफ्रिदी यांच्यासह त्यांची पत्नी, जावई आणि दोन वर्षाच्या नातवाचाही समावेश आहे.

स्वात खोऱ्यातून इस्लामाबादला येत असताना त्यांच्या वाहनावर काही बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्‌यामध्ये न्यायाधीशांचे दोन सुरक्षा रक्षक देखील जखमी झाले होते.

या घटनेनंतर पेशावर आणि खैबर प्रांतांमध्ये संयुक्त मोहीम राबवली गेली आणि पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. स्वाबी येथील जिल्हा पोलिस अधिकारी मोहम्मद शोएब यांनी आज ही माहिती दिली. हत्या झालेले न्यायाधीश आफ्रिदी यांचे पुत्र मजीद आफ्रिदी यांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये दहा संशयितांची नावे आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल लतिफ आफ्रिदी यांचेही नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. बार असोसिएशनचे अध्यक्ष लतीफ आफ्रिदी यांनी न्यायाधीशांच्या या हत्येचा निषेध केला आणि या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील कोणत्याही चौकशीला आपण सामोरे जायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.

आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्‌याची जबाबदारी घेतलेली नाही. पंतप्रधान इम्रान खान, खैबर पख्तूनख्वा प्रांताचे गव्हर्नर शाह फर्मान, मुख्यमंत्री केपीके मेहमूद खान आणि संसदेचे सभापती असद कैसर यांनीही या हत्याकांडाचा निषेध केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.