सीमावादावर तोडगा काढण्यास आसाम-मिझोराम सहमत

दोन्ही राज्यांमधील तणाव निवळण्याची चिन्हे

गुवाहाटी – आसाम आणि मिझोराम सरकारांनी गुरूवारी सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत सहमती दर्शवली. दोन्ही राज्यांनी विविध पाऊले उचलण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्हे आहेत.

आसाम-मिझोराममधील सीमावादाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण मिळाले. दोन्ही राज्यांमधील सीमेवर 26 जुलैला गोळीबार झाला. त्यामध्ये आसामच्या सहा पोलिसांसह सात जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील तणाव संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला. 

केंद्राने दोन्ही राज्यांना परस्पर सहमतीतून सीमावादावर तोडगा काढण्याची सूचना केली. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधींची गुरूवारी बैठक झाली. सीमेवरील तणाव संपवण्यासाठी आंतरराज्य वाहतूक सुरू करण्याचा निर्णय त्यामध्ये घेण्यात आला. त्याशिवाय, सीमाभागातून आपापली पोलीस दले हटवण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. 

केंद्राने याआधी बोलावलेल्या बैठकीवेळी सीमाभागात तटस्थ केंद्रीय दल तैनात करण्याचे ठरले. त्या निर्णयाचेही आसाम आणि मिझोरामने स्वागत केले आहे. दोन्ही राज्यांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे सीमेवर शांतता प्रस्थापित होण्याची शक्‍यता बळावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.