नवी दिल्ली – आसाममधील एका न्यायालयाने गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांच्याविरुद्ध खोटी एफआयआर नोंदवल्याबद्दल राज्य पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास कारणीभूत असलेली ती “वेडी व्यक्ती” कोण होती हे शोधण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आता सीबीआयवर सोपवतील का असा सवाल ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी या संबंधात उपस्थित केला आहे.
एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या कारणावरून जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात आसाम पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला होता. पण बारपेटा जिल्ह्यातील न्यायालयाने या प्रकरणावरून पोलिसांचीच चांगली खरडपट्टी काढली आहे. कोर्टाने पोलिस दलालाच स्वत:च्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची सूचना केली आहे.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना चिदंबरम यांनी म्हटले आहे की, दोन पुरुष पोलीस अधिकारी उपस्थित असताना त्यांच्या उपस्थितीत महिला अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचे धाडस मेवानी दाखवू शकत नाहीत त्यामुळे या गुन्ह्यात तथ्य नाही असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.
न्यायालयाला असे आढळून आले की मेवाणी हे वेडसर गृहस्थ आहेत असे मानणारा कोणताही पुरावा नाही, जर मेवाणी वेडे नव्हते आणि तरीही त्यांच्या विरोधात खोटी एफआयआर नोंदवली गेली असेल तर कोणीतरी वेडा असावा?मग हा वेडा इसम नेमका कोण होता याची चौकशी करण्याची विनंती आसामचे मुख्यमंत्री सीबीआयला करतील काय असा खोचक सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.
एका जुन्या खटल्यात जिग्नेश मेवानी यांना मध्यरात्री गुजरातहून आसाम पोलिसांनी अटक करून आसामला नेले होते. मोदींच्या विरोधात एक ट्विटर संदेश लिहील्याचे हे प्रकरण आहे. त्या प्रकरणात त्यांना न्यायालयाने जामीन मंजुर करताच मेवाणी यांना महिला पोलिसावर हल्ला केल्याच्या कारणावरून पुन्हा अटक करण्यात आली होती.