पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होताच राजकीय बैठकांना वेग आला आहे. इच्छुकांकडून तिकिटांसाठी मुंबई गाठण्याची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
यानंतर पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या यादीत पुण्यातून कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना प्रचारासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे.
त्यातच राज्यात एकाच टप्प्यात मतदान असल्याने सर्वच उमेदवारांना प्रचारासाठी नेत्यांच्या वेळा आणि सभांसाठीची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना स्वत:च प्रचारावर भर द्यावा लागणार आहे.
“एनओसी’साठी धावपळ
इच्छूक उमेदवारांकडून निवडणूक अर्ज भरण्यासाठी महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत “एनओसी’साठी अर्ज केले आहेत. त्यानुसार, आपल्यावर कोणतेही दायित्व नसल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी इच्छुकांचे कार्यकर्ते महापालिकेत तळ ठोकून आहेत. तर अनेकांनी तीन ते चार महिने आधीच ही प्रमाणपत्र काढून घेतलेली आहेत.
भाजपची आज पहिली यादी ?
महाराष्ट्रातील निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय कोअर कमिटीची बैठक दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात सोमवारी झाली. पहिल्या टप्प्यातील या बैठकीत भाजप लढविणार असलेल्या जागांबाबत चर्चा झाली.
यात कोणत्याही नावांवर तसेच जागा वाटपाबाबतही चर्चा झाली नाही. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या केंद्रीय कोअर कमिटीची मुख्य बैठक होईल. यावेळी पहिल्या काही उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.