शतावरी, अश्‍वगंधा लागवडीत 23 कोटींचा घोटाळा

लागवडीच्या बहाण्याने शेतकऱ्यांना गंडा; पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात व्याप्ती

पुणे  -औषधी वनस्पती शेतात लागवड केल्यानंतर त्याचे उत्पादन विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून पुणे, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील पाचशेंपेक्षा अधिक शेतकऱ्यांना तब्बल 23 कोटी 45 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे शाखेतील आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे.

 ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर (वय 38, रा. आकाशदीप सोसायटी, धायरी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शहा (वय 46, रा. जयराज किरण सोसायटी, वाळवेकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाटणकर याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पाटणकर हे शतावरी व अश्‍वगंधा औषधी वनस्पतींच्या लागवडीनंतर उत्पादीत पिक एकरी 3 लाख रुपये मोबदला देऊन विकत घेण्याचे आमिष शेतकऱ्यांना दाखवत होते. नागरिकांना योजनेबाबत विश्‍वास वाटावा म्हणून आयुष मंत्रालयाचा संदर्भ देते होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून गुंतवणूक केली. निर्धारित कालावधीनंतरही रक्‍कम मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटणकर याने तीन वर्षांपूर्वी शुन्य हर्बल ऍग्रो डेव्हलपमेट प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. त्याने शेकडो शेतकरी आणि गुंतवणूकदारांना शतावरी आणि अश्‍वगंधाची लागवड करावी, असे सांगितले. उत्पादीत पीक स्वत: विकत घेऊन त्यांना दरवर्षी एकरी 3 लाख रुपये मोबदला देण्याचे आमिष दाखविले.

 त्यासाठी एकरी 50 हजार रुपये कंपनीकडे जमा केल्यानंतर कंपनी शेतकऱ्यांना रोपे देणार, त्यांची लागवड, सुपर व्हिजन, खते देण्याचे आमिष दाखविले. एक वर्षांनी कंपनी स्वत: काढणी व वाहतूक करून शेतकऱ्यांना जागेवर पैसे देणार, अशी आश्‍वासने दिली. त्यानुसार सोलापूर, पुणे, रायगडसह अन्य जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी रोपे घेऊन लागवड केली. त्यानंतर 18 महिन्यांनी त्यांनी शेतीमालही काढून नेला. 

परंतु शेतकऱ्यांना पैसे मात्र दिले नाही. दीड ते दोन वर्षे शेतकरी पुण्यात अरण्येश्‍वर येथील कंपनीच्या कार्यालयात पैशांसाठी हेलपाटे मारत होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचीही शेतकऱ्यांनी भेट घेतली. तरीही कार्यवाही झाली नसल्याने शेवटी पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांना भेटून शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे. त्याने शेतकरी आणि गुंतवणुकदारांची सुमारे 23 कोटी 45 लाख 1 हजार 994 रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक सहाणे अधिक तपास करीत आहेत.

ऋषिकेश पाटणकर याने पुणे, सोलापूर, रायगडसह अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींची लागवड करून ती विकत घेण्याच्या बहाण्याने कोट्यवधींचा गंडा घातला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. अंदाजे 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाटणकर याने फसविले आहे.

– राजेंद्र सहाने, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.