सरकारी बॅंकांकडे कर्जासाठी ‘जास्त’ विचारणा

मुंबई – खासगी बॅंकांपेक्षा सरकारी बॅंकांकडे कर्जाची अधिक विचारणा होऊ लागली असल्याचे वातावरण आहे. यासंदर्भात क्रेडिट इन्फर्मेशन कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, सरकारी बॅंकांनी शाखांचे जाळे वाढविले असल्यामुळे नागरिकांकडून सरकारी बॅंकांकडे कर्जाची जास्त विचारणा केली आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये बॅंकांनी डिजिटल बॅंकिंगचा आक्रमक प्रसार केला आहे. या माध्यमातून कर्जाची विचारणा होऊन कर्जाचे वितरण होत आहे. मात्र तरीही शाखातील कामकाजावर फारसा परिणाम झालेला नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये खासगी बॅंकांकडे अधिक भांडवल असल्यामुळे खासगी बॅंका अधिक कर्ज वितरण करतील असे बऱ्याच विश्‍लेषकांनी सांगितले होते. परिस्थिती मात्र त्याच्या उलट असून सरकारी बॅंकांकडे कर्जासाठी जास्त विचारणा होत असल्याचे चित्र निर्माण
झाले आहे.

जुलै-ऑगस्टदरम्यान जमा केलेल्या आकडेवारीनुसार खासगी बॅंकांपेक्षा सरकारी बॅंकांकडे कर्जाबाबत जास्त विचारणा होत आहे. गेल्या वर्षातील या कालावधीच्या तुलनेत यावर्षी सरकारी बॅंकांकडे कर्जाच्या चौकशीत 118 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तर खासगी क्षेत्रातील बॅंकांकडे मात्र 70 टक्‍के अधिक विचारणा झाली असल्याचे दिसून आले. बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था आणि गृहकर्ज वितरण
संस्थांच्या संदर्भात हे प्रमाण केवळ 51 टक्‍के आहे.

खेड्यातून मागणी जास्त
शहरात करोना संसर्गाचे प्रमाण जास्त असल्यामुळे नागरिक आणखीही नियमित कामकाजाच्या मनःस्थितीत नाहीत. मात्र, छोटी शहरे आणि खेड्यांमधून कर्जाची मागणी जास्त होत असल्याची आकडेवारी या संस्थेने जारी केली आहे. शहरातून होणाऱ्या कर्जाच्या मागणीत 30 टक्‍के घट झाली आहे. तर खेड्यातून होणाऱ्या कर्जाच्या मागणीत 17 टक्‍के वाढ झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.