पिंपरी – किराणा माल आणण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीवर चाकूने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 3) सकाळी पिंपरीगाव येथे घडली.
मिनल संदीप शिंपी (वय 29) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. 3) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती संदीप सुनील शिंपी (वय 33, दोघेही रा. पिंपरीगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मिनल आपल्या पतीस म्हणाली, घरातील सर्व किराणा सामान संपले आहे. तुम्ही मला आणून देता का नाही. तुम्हाला फक्त दारू प्यायची आणि पार्टी करायचीच समजते का? तुम्ही रात्री पण दारू पिऊन आला होता.
पत्नीच्या या बोलण्याचा राग आल्याने पती संदीप शिंपी याने शिवीगाळ करीत पत्नीस हाताने मारहाण केली. त्यानंतर मिनल हिचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर कांदा कापण्याच्या सुरीने डाव्या हाताच्या पोटरीवर चाकूने वार करून मिनल यांना जखमी केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक पशाले याबाबत अधिक तपास करीत आहेत.