…अन्‌ शांततेच्या दिशेने आशियाई वाटचाल

नवी दिल्ली – भारताचे चीन आणि पाकिस्तान या शेजाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत शांतता प्रक्रियेची वाट धरली आहे. ज्यो बायडेन यांनी या विभागातील अमेरिकेचे परराष्ट्र धोरणण जाहीर करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही सारवासारव सुरू असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

1970 नंतर सर्वात मोठा रक्तलांछीत संघर्ष झालेल्या भारत आणि चीनमधील हिमालयातील सीमारेषेवरून सैन्य माघारी घेण्याबाबत भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये गुरूवारी चर्चा झाली. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे मंत्री वांग यी यांच्यात गुरूवारी दूरध्वनीवर तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली. त्याआधी तासभर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सीमेवर कारवाई थांबवण्याचे संयुक्त निवेदन जारी केले.

हे तीनही देश एकमेकांच्या भू भागावर हक्क सांगत असल्याने या तीन अण्वस्त्रधारी राष्ट्रांत कमालीचा तणाव आहे. भारत आणि पाकिस्तानात स्वातंत्र्यानंतर तीन युध्दे लढली गेली. या दोन देशांत अगदीच किरकोळ व्यापारी संबंध आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी ऍपवर बंदी घातल्याने भारत आणि चीनमधील संबंध गेल्या वर्षी दुरावले होते. त्यामुळे गुंतवणुकीच्या प्रस्तावाची मंजुरीही रखडली आहे.

ट्रम्प प्रशासनाकडून बायडेन यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर दक्षिण आशियातील समीकरणे बदलण्याची तयारी सुरू झाली. पाकिस्तान आपण चीनच्या फार जवळ नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. बायडेन यांनी भारताला झुकते माप देऊ नये म्हणून चीन भारताबरोबरचा तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपींग सदस्य असणाऱ्या ब्रिक्‍सचे नेतृत्व भारताला देण्यास त्या देशाने पाठींबा दिला, ासे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

अमेरिका आणि चीनमधील वैमनस्याचे संबंध पाहता भारताला महत्व मिळण्याची शक्‍यता आहडे. पाकिस्तान हा चीनचा समर्थक असल्याने त्याच्यावर दबाव येण्याची शक्‍यता आहे, असे इनिशिएटिव्ह ऑफ फ्युचर इंडिया अँड साऊथ एशियाच्या संचालक अपर्णा पांडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “मात्र चीनला थेट अंगावर घेताना अमेरिका किती पाठींबा देईल याची भारताला खात्री नाही. त्यामुळे पाकिस्तानसोबतची तात्पुरती शस्त्रसंधी आणि चीनबरोबर हळू हळू सीमेवरून सैन्यकपात यामुळे भारतावरील दबाव काहीसा कमी होऊ शकेल.’

पाकिस्तान आणि चीनसोबत भारताची सात हजार किमीची सीमा आहे. भारत आणि चीनने हिमालायाच्या काही भागातून आपले सैन्य माघारी घेतले असले तरी अनेक भागात दोन्ही देशाचे सैन्य आमने सामने ठाकले आहे. या पार्श्‍वभूमीवर जयशंकर यांनी वांग यांच्याकडे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याची गरज व्यक्त केली. वांग यांनी परस्पर विश्‍वासाचा मार्ग दोन्ही राष्ट्रांनी अवलंबण्याचीआणि परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली, असे चीनच्या सरकार माध्यमांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.