सुवर्ण विजेत्या दत्तूचे मंगळापूरला जंगी स्वागत

फटाक्यांची आतिषबाजी : फुलांनी सजविलेल्या वाहनातून वाद्यांच्या गजरात मिरवणूक

संगमनेर – जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग क्‍वाड्रापल गटात भारताला सुवर्णपदकाची कमाई करून देणाऱ्या संघातील रोइंगपटू दत्तू भोकनळ याचे मंगळवारी संध्याकाळी त्याच्या मूळगावी मंगळापूर (ता.संगमनेर) येथे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी फुलांनी सजविलेल्या वाहनातून वाद्यांच्या गजरात विजयी मिरवणूक काढत जल्लोषात फटाक्‍यांची आतषबाजी करत पेढ्यांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशासाठी गोल्ड मेडल आणल्याचा आनंद हा गगनात मावेल इतकाच. माझ्या मूळगावी मंगळापूर येथे आल्याचा फार आनंद झाला. मला वेळोवेळी आ. बाळासाहेब थोरात व डॉ संजय मालपाणी यांनी आर्थिक मदत केली. 2019 च्या एशियन चैंपियंस मध्ये सुवर्ण पदक आणि 2020 च्या ऑलिम्पिक मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी जोमाने सराव करणार आहे.
-दत्तू भोकनळ, सुवर्णा विजेता, आशियाई क्रीडा स्पर्धा

दत्तूची कहाणी रोमांच आणणारी आहे. अत्यंत कष्टातून दत्तूने हे यश संपादित केले. परिस्थिती कशीही असली तरी परिश्रमाने त्याच्यावर मात करता येथे हे दत्तूने दाखवून दिले आहे. मंगळापूर गावातून हे मंगल घडले आहे. दत्तुचे हे व्यक्‍तिमत्त्व महाराष्ट्राला नव्हे देशाला प्रेरणा देणारे ठरेल.
-डॉ. संजय मालपाणी, उद्योजक, बाल मानसशास्त्रज्ज्ञ

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नौकानयनपटूंनी धडाकेबाज कामगिरी करत भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने 6:17:13 अशी आश्‍वासक वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. भारताच्या दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह या चौकडीने भारताला नौकानयनात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिले. या संघातील दत्तूचे मुळगाव संगमनेर तालुक्‍यातील मंगळापूर आहे. 2016 रिओ ऑलिम्पिकमधील पदक हुकल्यानंतर दत्तूने त्याची भरपाई करत इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. मात्र दत्तूचा आत्तापर्यंतचा प्रवास खूपच खडतर राहिला आहे.

जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग क्वाड्रापल गटात भारताचे नेतृत्व करून देशाचे नाव या क्रीडा प्रकारात उंचावणाऱ्या दत्तू भोकनळ याचे संध्याकळी आठ वाजता मुळगाव मंगळापूर येथे आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी मंगळापूर फाटा ते मंगळापूर गावापर्यंत फुलांनी सजविलेल्या वाहनातून वाद्यांच्या गजरात विजयी मिरवणूक काढत जल्लोषात फटाक्‍यांची आतषबाजी करत पेढ्यांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

दत्तू पदकाची कमाई करणारच असा ग्रामस्थांना विश्वास होता. तापाने फणफणलेल्या दत्तूने मी पदकाची कमाई करेन, असा आत्मविश्वास त्याने ग्रामस्थांना दिला होता. हाच आत्मविश्‍वास त्याने सार्थ केल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले होते. दत्तूच्या यशाचा आम्हाला खूप अभिमान असून, त्याने देशाची मान उंचावली, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी याप्रसंगी व्यक्‍त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)