Asian Champions Trophy 2024 (India vs China, Final) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे आणि आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑलिम्पिकनंतर पहिली स्पर्धा खेळणाऱ्या टीम इंडियाने सोमवारी, 16 सप्टेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 4-1 ने दारूण पराभव केला आणि पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024
अंतिम सामना : भारत वि. चीन
वेळ : 17 सप्टेंबर, दुपारी 3:30 वाजता
ठिकाण : हुलुनबीर
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क
अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना आज चीनशी होईल, ज्यांनी पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. या उपांत्य फेरीत 60 मिनिटांपर्यंत (निर्धारित वेळेत) स्कोर 1-1 असा बरोबरीत राहिला, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे निर्णय घेण्यात आला. येथे पाकिस्तानी खेळाडूंना एकही गोल करता आला नाही, तर चीनने 2 गोल करत सामना 2-0 असा जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. हा अंतिम सामना आज (मंगळवार 17 सप्टेंबर) दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ साखळी टप्प्यातील त्यांच्या पहिल्याच सामन्यात भिडले होते, ज्यामध्ये भारताने 3-0 असा विजय मिळवला होता.
हेड-टू-हेड रेकाॅर्ड
आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये भारताने 17 वेळा बाजी मारली आहे तर तीन वेळा चीनने विजय साकारला आहे. तीन सामने अनिर्णित (Drawn) राहिले आहेत. भारताने या दरम्यान एकूण 79 तर चीनने 24 गोल केले आहेत.
भारतानं पटकावलंय 4 वेळा जेतेपद…
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय हॉकी संघाचे वर्चस्व राहिले आहे. 2011 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आतापर्यंत सर्वाधिक 4 जेतेपदं जिंकली आहेत. भारताने (2011, 2016, 2018, 2023) चार आणि पाकिस्तानने (2012, 2013, 2018) तीन जेतेपद जिंकली आहेत. यामध्ये 2018 मध्ये भारत व पाकिस्तान यांना संयुक्त जेतेपद दिले गेले होते. तर दक्षिण कोरियाने 2021 मध्ये बाजी मारली होती.