नवी दिल्ली – दुबईत होणाऱ्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचा सहभागाचा मार्ग अखेर मोकळा झाला. व्हिसाच्या प्रश्नामुळे हा सहभाग अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला होता.
अमित पंघालसह ऑलिम्पिक पात्र खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ येत्या शुक्रवारी दुबईत दाखल होणार आहे. आशियाई स्पर्धा आधी भारतात होणार होती; परंतु करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढल्यामुळे ही स्पर्धा दुबईत हलवण्यात आली. 23 मे रोजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून, 24 मे रोजी स्पर्धेला प्रारंभ होईल.
व्हिसाच्या तसेच प्रवासाच्या नव्या निर्बंधांमुळे या स्पर्धेतील भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. संयुक्त अरब अमिरातीमधील प्रशासनाने भारतीय संघाला व्हिसा; तसेच अन्य काही सवलती देण्याचे मान्य केल्याने हा तिढा सुटला.
करोनातून अद्याप सावरला नसलेल्या मनीष कौशिक व सतीश कुमार या ऑलिम्पिक पात्र खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
भारतीय संघ : पुरुष : विनोद तन्वर, अमित पंघाल, महंमद हसमुद्दीन, वरिंदर सिंग, शिव थापा, विकास कृष्णन, आशिष कुमार, सुमित संगवान, संजीत, नरिंदर. महिला : मोनिका, एमसी मेरी कोम, साक्षी, जस्मिन, सिम्रनजीत कौर, लालबुआतसैही, लव्हलिना बार्गोहेन, पूजा राणी, स्वीटी, अनुपमा.