सायना, सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत

भारताचे बॅडमिंटन मधिल आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली – आशियाई बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धेत तब्बल 54 वर्षांनी विजेतेपद मिळवण्याचे भारतीय बॅडमिंटनपटूंचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकले नाही. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल, तर पुरुषांमध्ये समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत झाल्याने भारतालाही स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

महिलांच्या गटात जपानच्या तृतीय मानांकित अकानी यामागुचीने संघर्षपूर्ण सामन्यात सातव्या मानांकित सायनाला तीन गेममध्ये पराभूत केले. एक तास नऊ मिनिटे चाललेल्या या सामन्यात यामागुचीने सायनाला 21-13, 21-23, 21-16 असे सहज नमवत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. तर, चीनच्या बिगरमानांकित काई यानयानने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चौथ्या मानांकित सिंधूला 21-19, 21-19 असे एकतर्फी पराभूत करत धक्कादायक विजयाची नोंद केली.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या सिंधूचा यानयानने केवळ 31 मिनिटांमध्येच पराभव केला. तर, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या दुसऱ्या मानांकित शी युकीने समीरला 21-10, 21-12 अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. समीरव्यतिरिक्त एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किदम्बी श्रीकांतचे आव्हान बुधवारी पहिल्या फेरीतच संपुष्टात आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.