दुबई – पाकिस्तानचा पराभव करत आशिया करंडक जिंकणारा श्रीलंका संघ मालामाल बनला आहे. विजेतेपदाबद्दल श्रीलंका संघाला दीड लाख डॉलर्सचा (जवळपास सव्वा कोटी रुपये) पुरस्कार मिळाला. या पुरस्काराबरोबरच त्यांच्या खेळाडूंनी सामनावीर, मालिकावीर तसेच अन्यही काही पुरस्कार पटकावले.
रविवारी झालेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासातील सहावे विजेतेपद साकार केले. मालिकेचा मानकरी ठरलेल्या वानिंदू हसरंगाला 15 हजार डॉलर मिळाले. अंतिम सामन्याचा मानकरी ठरलेल्या भानुका राजपक्षेला 5 हजार डॉलर्स बक्षीस मिळाले. तसेच त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल घेतल्याबद्दल 3 हजार डॉलर्सचा धनादेशही मिळाला. पाकिस्तान संघाला उपविजेतेपदासाठी 75 हजार डॉलरचा पुरस्कार देण्यात आला.
📸 Snapshots from the Awards ceremony#RoaringForGlory #AsiaCup pic.twitter.com/x3ce40ieej
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 12, 2022
राजा भारतीय पत्रकारावर संतापले
अंतिम सामन्यानंतर काही भारतीय पत्रकारांनी तेथे उपस्थित असलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू रमीज राजा यांना प्रतिक्रिया विचारली होती, त्यावेळी त्यांनी भारतीय पत्रकारांवरच आपला रोष व्यक्त केला. तुम्ही भारतीय आमच्या पराभवानंतर आनंदी झाला असाल, असा सवालही त्यांनी केला. मात्र, संघाच्या पराभवाची निराशा त्यांनी भारतीय पत्रकारांवर काढली, असे ताशेरे चाहत्यांनी लगावले आहेत.
भारतीयांना प्रवेश नाकारला
अंतिम सामन्याचा आनंद लुटण्यासाठी तिकिटे खरेदी करून मैदानात प्रवेश करत असलेल्या भारतीयांना प्रवेश नाकारण्यात आला होता. काही वेळाने श्रीलंकेची जर्सी परिधान केली तरच प्रवेश मिळेल असेही सांगण्यात आले. आयोजकांनीही त्यात हस्तक्षेप केला नाही व त्यामुळे भारतीय प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
आता याबाबत आशिया क्रिकेट समिती (एससीसी) व बीसीसीआय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे या सामन्यासाठी उपस्थित होते त्यामुळे आता ते यावर काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.