दुबई – करोनामुळे गेली दोन वर्षे आयोजित न होऊ शकलेली आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा आजपासून (शनिवार) येथे सुरू होत आहे. या स्पर्धेची सलामीची लढत यजमान देश असलेल्या श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा आशिया क्रिकेट समितीने श्रीलंकेच्या यजमानपदात खेळवण्याचे निश्चित केले होते. मात्र, श्रीलंकेतील अराजकता तसेच खालावलेली आर्थिक स्थिती पाहता ती अमिरातीत हलवण्यात आली आहे.
अर्थात, तरीही यजमानपद श्रीलंकेकडेच राहणार असून महसुलातील सर्वात मोठा वाटा देखील त्यांच्याच क्रिकेट मंडळाला मिळणार आहे. अफगाणिस्तानचा संघही या स्पर्धेत आश्चर्यकारक निकाल नोंदवू शकतो. त्यांचा संघही समतोल असून श्रीलंका संघाला प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीने सतावल्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून रंगतदारही ठरेल अशी अपेक्षा आहे.
या स्पर्धेत यंदा हॉंगकॉंगच्या संघाने सहावा संघ म्हणून पात्रता मिळवली आहे. त्यांनी अमिराती संघासह पात्रता स्पर्धेतील अन्य संघाचाही पराभव केल्यामुळे त्यांनाही कमी लेखून चालणार नाही. दुसरीकडे बांगलादेश संघही या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज बनला आहे. त्यांना नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला सला तरीही त्यांनी भारत, पाकिस्तान, श्रीलंकासह अन्य बलाढ्य संघांनाही अनेकदा पराभूत करण्याची किमया केली आहे.
रशिद खान निर्णायक ठरेल
श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत अफगाणिस्तानकडे रशिद खान नावाचे एक अस्त्र आहे. खरेतर एक लेग स्पीन गोलंदाज म्हणून संघात पदार्पण केलेल्या रशिदने काही काळातच फलंदाजीतही आपला ठसा उमटवला. त्याच्या आक्रमक फलंदाजीने केवळ आंतरराष्ट्रीय लढतीत अफगाणिस्तानलाच नव्हे तर आयपीएलसारख्या टी-20 लीगमध्येही गोलंदाजांना त्रस्त केले आहे. त्यामुळे या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना रशिदला रोखण्यासाठी योजना तयार करून त्यानुसार गोलंदाजी करावी लागणार आहे.