नवी दिल्ली : जागतिक आर्थिक मंचच्या परिषदेसाठी रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे दावोसला जाणार आहेत. दावोसला रवाना होण्यापूर्वी वैष्णव यांनी भारताने सर्व समाजघटकांना, विशेषतः प्रगतीपासून वंचित राहिलेल्या घटकांना प्रगत करण्यात केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
बँक खाती उघडून आर्थिक समावेशकता साधणे, शौचालये, गॅस जोडणी, नळाद्वारे पाणी पुरवठा आणि ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधा उभारणे, यासारख्या मूलभूत सेवांचा लाभ देणे, या संकल्पना जगाला समजून घ्यायच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. जागतिक आर्थिक मंचात समावेशक विकास, सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक तसेच तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण यावर या मंचावर सविस्तर चर्चा होईल.
भारताच्या आर्थिक धोरणांवर, डिजिटल इंडिया कार्यक्रमाने घडवलेल्या बदलांवर आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्याच्या उपक्रमांवर जगाचे लक्ष केंद्रित आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत विकसित केलेली भारताची नाविन्यपूर्ण डिजिटल संरचना समावेशक विकास साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो, याचे जागतिक प्रमाण ठरली आहे, असेही त्यांनी सांगितले.